देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
वृद्धांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना लोकांना देण्यात आल्या आहेत. बुधवारपर्यंत देशातील ८ राज्य उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात येतील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्याबाबत हवामान खात्याने एक सल्लाही जारी केला आहे. ७ ते ९ जून दरम्यान विदर्भ आणि पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काय म्हणाले हवामान खात्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ?
भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.नरेश कुमार म्हणाले की, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सातत्याने सुरू आहे. या राज्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. बिहारमधील काही भागात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे, जेथे तापमान सरासरीपेक्षा ६.५ अंश सेल्सिअसवर गेले आहे. आम्ही बिहार आणि पश्चिम बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
डॉ. नरेश कुमार म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये तीव्र उष्णतेसोबतच आर्द्रतेचे प्रमाणही खूप जास्त आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारताच्या भागातही येत्या ५ दिवसांत तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
मान्सूनचे उशीरा आगमन
भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आर.के. जेनमानी म्हणाले की, चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम झाला आहे. मान्सून केरळच्या किनारपट्टीवर कधी दाखल होईल, याबाबत आत्ताच आम्ही निश्चित वेळ सांगू शकत नाही. ते म्हणाले की अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्यास थोडा विलंब झाला आहे.