नवी दिल्लीः भीषण उन्हाच्या झळा आणि उष्णतेच्या लाटेनं उत्तर भारत होरपळून निघाला आहे. वेगवेगळ्या राज्यांत उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या उष्णतेच्या झळा फक्त मैदानी राज्यांनाच नव्हे, तर पर्वतीय राज्यांनाही बसत आहेत. हिमाचलमधल्या ऊनामध्ये 42 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच पर्वतीय भागात उष्णतेचा कहर जाणवतो आहेत. आणखी दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.उत्तर प्रदेशमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान बांदामध्ये नोंदवलं गेलं आहे. बांदामध्ये 49 डिग्री सेल्सियस तापमान होतं, तर महोबामध्ये 47 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. हरियाणातही तापमान 48 अंशांवर पोहोचलं आहे. तर नारनौलमध्ये 47.6 डिग्री सेल्सियस तापमान होतं. पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम आहे. त्याशिवाय राजस्थानमधल्या सहा शहरांमध्ये पारा 47 डिग्रीच्या वर गेला होता. राजस्थानच्या चुरूमध्ये शनिवारी 50.8 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे.
उत्तर भारतात उष्णतेची लाट, उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 8:39 AM