Gujarat High Court: न्यायालयीन कामकाजात न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये सुनावणीदरम्यान अनेकदा चर्चा, वाद विवाद होत असतात. अनेकदा न्यायमूर्ती वकिलांना खडेबोल देखील सुनावतात. मात्र गुजरातमध्ये न्यायालयीन कामाकाजादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. गुजरातमध्ये वकिलांनीच न्यायाधीशांनी सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश सुनीता अग्रवाल आणि उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचे अध्यक्ष असलेले वकील ब्रिजेश त्रिवेदी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. ब्रिजेश त्रिवेदी यांनी न्यायालयात मुख्य न्यायाधीशांच्या वर्तनावर टीका केली आणि तुम्ही कधीही वरिष्ठ वकिलांना त्यांचे युक्तिवाद पूर्ण करू देत नाहीत, असं म्हटलं.
शुक्रवारी गुजरात हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि हायकोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रिजेश जे त्रिवेदी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यावेळी एका जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. वकील ब्रिजेश त्रिवेदी यांनी न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या वागणुकीवर टीका केली. तुम्ही वकीलांना, विशेषत: ज्येष्ठ वकिलांना त्यांचा युक्तिवाद संपवण्याची संधी देत नाहीत. ही परिस्थिती आपण सहन करत आहोत, पण असे वारंवार घडत असून ते योग्य नाही, असे ब्रिजेश त्रिवेदी म्हणाले.
"इथे सारखं सारखं उलटं होत आहे. न्यायालयाच्या प्रत्येक वरिष्ठ वकिलांनी हे सहन करण्यास अतिशय दया दाखवली आहे. मी २०२३ मध्ये लॉर्ड फ्रान्सिस बेकनचा एक चांगला कोट वापरला होता. मला आता तेच बोलून दाखवायचे नाही. मला आशा आहे की तुमच्या महाराणीच्या ते लक्षात असेल. हे लक्षात ठेवा मी न्यायाधीश नाही, हे अतिशयोक्तीपूर्ण न्यायाधीशांबद्दल आहे," असं वकील ब्रिजेश त्रिवेदी यांनी म्हटलं.
न्यायाधीश अग्रवाल आणि न्यायमूर्ती प्रणव त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर बेकायदा बांधकामांशी संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. या खटल्यात याचिकाकर्त्यांतर्फे अधिवक्ता बाजू मांडत होते. त्यावेळी न्यायाधीश अग्रवाल यांनी त्रिवेदी यांना सांगितले की, "कृपया मला माझे म्हणणे पूर्ण करू द्या. मी तुम्हाला काही विचारले होते पण तुम्ही मला माझा प्रश्न पूर्ण करू दिला नाही." त्यावर त्रिवेदी यांनी, "काही हरकत नाही. तुम्ही आदरयुक्त प्रश्न विचारू शकता," असं म्हटलं.
हे प्रकरण वाढले तेव्हा त्रिवेदी यांनी न्यायालयाला प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवण्यास सांगितले. तेव्हा न्यायाधीश अग्रवाल यांनी कोर्टात असा प्रकार व्हायला नको असं म्हटलं. त्यावर त्रिवेदी यांनी खटल्याच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांचा वेळ हवा आहे असं म्हटलं. यावर न्यायाधीशांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दुसऱ्या वकिलाने त्रिवेदींना शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्रिवेदी आपल्या मागणीवर ठाम राहिले.
ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने खटल्यांची सुनावणी करायला हवी ती ही पद्धत नाही. या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती त्रिवेदी यांनी न्यायालयाला केली आणि न्यायालयाची ही वागणूक योग्य नसल्याचे सांगितले. प्रकरण आणखी वाढल्यावर त्रिवेदी यांनी न्यायाधीशांवर ‘ओव्हरस्पीकिंग जज’ असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्रिवेदी कोर्टरुममधून बाहेर पडले.