नवी दिल्ली: देशभरात उन्हाचा पारा चढला असून, उत्तर भारतात उष्णतेच्या लाट पसरली आहे. यातच, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 15-17 जून दरम्यान उष्णतेमुळे किमान 98 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांत यूपीमध्ये 54, तर बिहारमध्ये 44 लोकांचा मृत्यू झाला आहे.
यासोबतच ताप, धाप लागणे आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे 400 हून अधिक लोकांना गेल्या तीन दिवसांत बलिया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बहुतांश रुग्ण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. बलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जयंत कुमार यांनी शनिवारी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, अति उष्णतेमुळे सर्व रुग्णांची प्रकृती बिघडली आहे. तसेच, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि अतिसार, हे मृत्यूचे कारण आहे.
तिकडे बिहारमध्ये गेल्या 24 तासांत उष्णतेमुळे 44 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या पाटण्यात 35, नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 19 आणि PMCH मध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पाटण्याचे कमाल तापमान 44.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पाटणा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये 24 जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान संस्थेने 18 आणि 19 जून रोजी बिहारसाठी 'अत्यंत उष्णतेचा' अलर्ट जारी केला आहे.