ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 14 - ट्रेनने प्रवास करताना अनेक चित्रविचित्र घटनांना सामोरं जावं लागत असतं. पण बिहारमधील बक्सर येथे ट्रेन ड्रायव्हरने कहरच केला. ट्रेन स्टेशनला लागली असताना हे महाशय आंघोळ आणि जेवणासाठी चक्क घरी निघून गेले होते. त्यांच्या या राजेशाही थाटाचा प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप झाला. प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर तब्बल दोन तास ड्रायव्हरची वाट पाहत बसावं लागलं. गेल्या मंगळवारी ही विचित्र घटना घडली आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाटणाहून निघालेली ही ट्रेन मुगलसरायला चालली होती. ट्रेन वेळेत सुटल्याने प्रवाशी आनंदात होते. ट्रेन जेव्हा प्लॅटफॉर्मवरुन निघाली तेव्हा आपल्या वेळेत आपण पोहोचू म्हणत आराम करणा-या प्रवाशांचा आनंद तात्पुरता असेल याची त्यांनाही कल्पना नव्हती. आधीच उन्हाने कहर केला असताना ड्रायव्हर त्याहूनही जास्त कहर करेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. सकाळी 10.55 वाजता ट्रेन बक्सर स्टेशनला पोहोचली आणि प्रवाशांचा उलटा प्रवास सुरु झाला.
सिग्नल मिळून 20 मिनिटं झाली तरी ट्रेन काही हालायचं नाव घेत नव्हती. दुस-या ट्रेनसाठी ट्रॅक मोकळा करावा अशी घोषणा करत ट्रेन लवकरात लवकर काढावी अशी घोषणाही करण्यात आली. सगळं स्टेशन पालतं घातलं तरी ड्रायव्हर एम के सिंह याचा काही पत्ता लागेना. शेवटी वैतागलेल्या प्रवाशांचा गोंधळ सुरु झाला.
काही वेळानंतर माहिती मिळाली की ड्रायव्हर महाशय आंघोळपाणी आणि जेवणासाठी आपल्या घरी गेले आहेत. संपुर्ण आराम झाला की ते परततील. यावर हर म्हणजे स्टेशन मास्तरांनी अशी अनाऊंसमेंट केली. पुर्ण अडीच तासानंतर एक वाजून 17 मिनिटांनी ड्रायव्हर परतला. आणि शेवटी उलटा सुरु झालेला प्रवास संपला.
घटनास्थळी उपस्थित प्रसारमाध्यमांनी ड्रायव्हरला ट्रेनला इतका उशीर का झाला असं विचारलं असता त्यांनी काही न बोलता दरवाजा बंद केला, आणि ट्रेन सुरु करुन निघून गेले. याप्रकरणी रेल्वे प्रवक्ता आर के सिंह यांनी "हे प्रकरण गंभीर आहे. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल", असं सांगितलं आहे.
गेल्यामहिन्यातही बक्ससमध्ये अशीच घटना समोर आली होती जेव्हा आपल्या असिस्टंटला चहा पिता यावं यासाठी ड्रायव्हरने ट्रेन थांबवली होती. ग्रामस्थांनी गोंधळ घाल्यानंतर कुठे ट्रेन सुरु झाली होती.