नवी दिल्ली - आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधीलपूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पावसाचा फटका या राज्यांना बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत 170 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बिहार, आसाम आणि उत्तर प्रदेशसोबतच मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू यासह अनेक राज्यात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहारमधील 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आतापर्यंत 104 लोकांचा मृत्यू झाला आहे. 76 लाख 85 हजाराँहून अधिक लोकांना जोरदार पावसाचा फटका बसला आहे. तसेच आसामच्या 29 जिल्ह्यांतील 57, 51,938 लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 4,626 गावे पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वीआसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा अशी मागणी आसामच्या खासदारांनी केली होती.
आसाममध्ये महापुरामुळे 430 चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील 90 टक्के भागात पाणी शिरले आहे. गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील सर्व प्राणी या जलप्रलयापासून जीव बचावण्याकरिता उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत. मात्र, या प्रयत्नात शनिवारपासून आतापर्यंत 23 प्राणी मरण पावले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 29 जिल्ह्यांना पुराने घेरले आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांत धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, सोनीतपूर, दारंग, बक्सा, बारपेट, नालबारी, चिरंग, बोंगाईगाव, कोक्राझार, गोलपाडा, मोरीगाव, होजई, गोलाघाट, मजुली, जोरहाट, शिवसागर, दिब्रुगढ आणि तीनसुकिया यांचा समावेश आहे.
आसाममधील सध्याच्या पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून दूरध्वनीवरून घेऊन ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात पूर आणि दरडी कोसळून काही लोकांचा मृत्यू झाला आहे. बक्सा जिल्ह्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत 850 नागरिकांची पुरातून सुखरूप सुटका केली आहे. नदी काठावर बांधण्यात आलेले कूस, रस्ते, पूल आणि इतर बांधकामे वाहून गेली आहेत. प्रशासनाने 11 जिल्ह्यांत 68 मदत छावण्या उभारल्या आहेत. त्यामध्ये हजारो लोकांनी आश्रय घेतला आहे.
आसाम पूरग्रस्त परिस्थिती; रोहित शर्माचं भावनिक आवाहन, म्हणाला...
आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीवर भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मान नागरिकांना आवाहन केले आहे. आसाममध्ये आलेल्या पूरग्रस्त परस्थितीवर त्याने चिंता व्यक्त केली. या पुरामुळे तेथील वन्यजीवांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांनी हक्काचे घर गमावले आहे. त्यामुळे नव्या निवाऱ्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक प्राणी रस्त्यावर आलेले दिसत आहेत. त्यामुळे रोहितने तेथील लोकांना वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन केलं आहे.
आसाम महापुराच्या संकटात, 'सुवर्णकन्या' हिमा दासची मदतीसाठी साद! आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीत तेथील नागरिकांना मदत करावी असे आवाहन सुवर्णकन्या हिमा दासनं केलं आहे. तिनं तिच्या पगाराची निम्मी रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे. हिमा दास इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये HR अधिकारी म्हणून काम करते. शिवाय तिनं अनेक कॉर्पोरेट्स कंपन्यांना मदतीसाठी आवाहन केले आहे. ''आसाममधील पूरपरिस्थिती गंभीर आहे. 33पैकी 30 जिल्हे पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे मी सर्व कॉर्पोरेट्स आणि सर्वांना विनंती करते की या कठीण समयी आसामला मदत करा,'' अशी फेसबुक पोस्ट हिमाने लिहिली आहे.