शिमला - गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये हवामान सातत्याने बिघडत आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली होता. दरम्यान, कालका-शिमला रेल्वे ट्रॅकवर झालेल्या भूस्खलनामुळे ट्रेन अडकली. मात्र सुदैवाने मोठा रेल्वे अपघात होता होता टळला.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमाने ९.३० च्या सुमारास कालका येथून शिमला येथे जाणारी सुपर ट्रेन पट्टा मोड येथे आली असताना मोठ्या प्रमाणात माती आणि दगड ट्रॅकवर आले. मात्र लोको पायलटने प्रसंगावधान दाखवत एमर्जन्सी ब्रेक दाबत ट्रेन थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र ट्रेनचं इंजिन जाऊन ढिगाऱ्यामध्ये अडकले. या अपघातात कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे रुळांवरील दगडा-मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू झालं. दरम्यान, सुपर ट्रेनला रिलिफ ट्रेन पाठवून धर्मपूर येथे माघारी बोलावण्यात आले आहे. तर मेल ट्रेन तिथेच थांबवण्यात आली. त्याबरोबरच या मार्गावरून धावणाऱ्या इतर गाड्यांनाही धर्मपूर येथेच थांबवण्यात येत आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जर ट्रेन येत असताना ढिगारा कोसळला असता तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती. कारण ट्रॅकवर पडलेला दगड खूप मोठा आहे. जर तो ट्रेनवर पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असता. सध्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी ढिगारा हटवून ट्रॅक दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर करत आहेत. ट्रॅक दुरुस्त केल्यावर थांबवून ठेवलेल्या ट्रेन रवाना केल्या जातील. तर सुपर ट्रेनच्या प्रवाशांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.