हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. राज्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता. पंडोह येथे नदीचं पाणी घर व बाजारपेठेत शिरलं आहे. मंडी ते मनाली हा चंदिगड मनाली महामार्ग विविध ठिकाणी दरड कोसळल्याने बंद करण्यात आला आहे. सोलनमध्ये कालका-शिमला ट्रॅकवर ट्रेनची वाहतूक थांबवण्यात आली आहे. हिमाचलमध्ये 24 तासांच्या पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. यासोबतच भूस्खलनामुळे 250 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत.
लाहौल-स्पितीच्या समदो काझा ग्रांफू रस्त्यावर पुरानंतर, ग्रांफू आणि छोटा दर्रा दरम्यान दोन ट्रेवलरमध्ये 30 महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले होते, त्यांना रात्रभर चाललेल्या बचाव मोहिमेनंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मंडी-पंडोह NH वर भूस्खलनामुळे रस्ता बंद झाला होता. कुल्लूच्या आखाडा बाजारात नदीच्या पाण्याची पातळी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. परिसरात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी भूस्खलनामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.
रस्ते बंद, 3 जणांचा मृत्यू
लाहौलच्या जुंडा नाला आणि तेलिंग नाल्याला पूर आल्याने मनाली-लेह रस्ता बंद करण्यात आला आहे. कुल्लू येथील राहनीनाला येथे दरड कोसळल्याने रोहतांग रस्ताही बंद करण्यात आला आहे. कालका-शिमला रेल्वे मार्गावरील ट्रेन बंद आहेत. शिमल्याच्या धिंगू मंदिराला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठी दरड कोसळली आहे. उना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅकच्या इलेक्ट्रिक लाईनवर झाड पडून आग लागली. चंबा येथील सरोथा नाल्यात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाने तातडीने दहा हजारांची मदत दिली आहे. श्रीखंड महादेव यात्रेदरम्यान एका भाविकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेपत्ता आहेत. कुल्लूच्या लंका बेकरमध्ये घर कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे.
पुरामध्ये अडकले लोक, रेड अलर्ट जारी
मंडी जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसाने आता कहर केला आहे. चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणं मोठ्या प्रमाणात भूस्खलनामुळे बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यायी मार्गही पूर्णपणे बंद असल्याने लोक अडकून पडले आहेत. पंडोहचा अर्धा बाजार पाण्याखाली गेला आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. पुरामुळे 6 लोक त्यांच्या घरात अडकले होते, त्यांना स्थानिक पोलीस आणि SDRF च्या टीमने सुखरूप बाहेर काढले. हवामान खात्याने हिमाचलमध्ये 9 जुलैला रेड अलर्ट जारी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.