तिरुवनंतपुरम - केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या शंभर वर्षातील सर्वात भीषण महापुराचा सामना केरळला करावा लागला आहे. केरळमध्ये पुरस्थिती आली असताना दुसरीकडे उर्वरित दक्षिण भारत मात्र दुष्काळाच्या छायेत आहे. केरळ आणि आंध्र प्रदेशचा काही भाग वगळता उर्वरित दक्षिण भारताला दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा आणि रायलसीमा या भागातील 95 जिल्ह्यांपैकी 47 जिल्ह्यात यावेळी सरासरीच्या सुमारे 20 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. तर पाच जिल्ह्यांमध्ये 60 टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. या संपूर्ण भागात मिळून सरासरीपेक्षा 42 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण पश्चिम राजस्थानपेक्षाही कमी आहे. तामिळनाडूतील 32 पैकी 22 जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर कर्नाटकच्या अंतर्गत भागातही 21 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. याउलट केरळच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. कर्नाटकमध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक दिसत असले तरी राज्यातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला आहे. कर्नाटकमधील कोडगूसह 15 जिल्ह्यात अधिक पाऊस पडला आहे. तर 15 जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मात्र पर्जन्यमान चांगले झाले आहे. तेलंगाणातील 31 पैकी केवळ 6 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर आंध्र प्रदेशच्या किनारी जिह्ल्यांमध्येही सरासरीपेक्षा 21 टक्के अधिक पाऊस झाला आहे. केरळमध्ये सरासरी पेक्षा 40 टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर मध्य भारतात गुजरात वगळता अन्यत्र सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण देशात मिळून सरासरीपेक्षा 7 टक्के कमी पाऊस पडला आहे.
केरळमध्ये महापूर पण उर्वरित दक्षिण भारत दुष्काळाच्या छायेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 4:23 PM