माउंट आबू , दि. 26- राजस्थानमध्येही गेल्या अनेक दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथिल जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजस्थानच्या माउंट आबूमध्येही मुसळधार पावसामुळे परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली आहे. तेथे पावसाने गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्डही तोडला आहे. माउंट आबूमध्ये गेल्या तीन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन हजार पर्यटक अडकल्याची माहिती मिळते आहे. पावसामुळे तेथे भुस्खलन झालं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तेथिल वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहतूक थोड्या प्रमाणात पूर्वपदावर यायला अजूनही काही तास लागणार असल्याची माहिती मिळते आहे.
Rajasthan: Abu Road, leading to Mount Abu, blocked due to falling of boulder; contact with 104 villages cut off, around 2000 tourists stuck pic.twitter.com/h6L7HdoXhU
— ANI (@ANI_news) July 26, 2017
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत माऊंट आबूमध्ये 733.6 एमएम पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे तेथिल परिस्थिती गंभीर झाली असून जिल्ह्यातील सगळ्या धरणांनी धोक्याची पातळी गाठली आहे.
राजस्थानमध्ये जनजीवन विस्कळीतराजस्थानच्या जालोर आणि सिरोहीमध्ये पूरस्थिती कायम असून गेल्या २४ तासांत २०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. राज्याचे मुख्य सचिव (आपत्कालीन विभाग) हेमंत गेरा यांनी सांगितले की, पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याचे जवान आणि राष्ट्रीय आपत्कालीन विभाग कार्यरत आहेत.जालोरचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण सोनी यांनी सांगितलं की, जालोरमध्ये झाडावर बसलेल्या सात लोकांना हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित बाहेर काढलं आहे. राष्ट्रीय आपत्कालिन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने अन्य १९ जणांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. पालीचे जिल्हाधिकारी सुधीर नायक यांनी सांगितले की, येथे पूरस्थितीत सुधारणा होत आहे. मदतकार्य वेगाने सुरु आहे आणि पुरात फसलेल्या नागरिकांना एनडीआरएफ, सैन्याचे जवान आणि जिल्हा प्रशासन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. आगामी २४ तासात दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम पूर्व राजस्थानात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यातील माउंट आबू येथे सर्वाधिक ७३३ मिमी पाऊस झाला आहे. जालोरमध्ये ४३, बाडमेर ४१, फलोदी २७ मिमी पाऊस झाला आहे.ओडिशात सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिले आहेत. केंझार, भद्रक आणि जयपूर जिल्ह्यातील सखल भागातील नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतरित करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत. बैतराणी, ब्रह्माणी, सुवर्णरेखा, जलाका या नद्यांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी ६० शिबिरं स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.या पुरामुळे हजारो नागरिकांना फटका बसला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी मंगळवारी सकाळी संसद भवनात मोदी यांच्याशी चर्चा करून पूरस्थितीची माहिती त्यांना दिली. गत २४ तासांत बनासकांठा, पाटन आणि साबरकांठा जिल्ह्यात २०० मिमी पाऊस झाला आहे.