कळस परिसरात दमदार पाऊस
By admin | Published: September 10, 2015 4:46 PM
कळस : कळस व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्यांच्या आशा रब्बीसाठी पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीप वाया गेला आहे. मात्र, पावसाला सुरुवात झाल्यामुळे फळबागा व रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.
कळस : कळस व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्यांच्या आशा रब्बीसाठी पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीप वाया गेला आहे. मात्र, पावसाला सुरुवात झाल्यामुळे फळबागा व रब्बी हंगामाला फायदा होणार आहे. कळस (ता. इंदापूर) व परिसरातील गोसावीवाडी, पिलेवाडी, बिरंगुडी, रूई भागात गेल्या दोन दिवसांपासून चांगला दमदार पाऊस होत आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना फायदा होणार आहे. खरीप हंगामातील पाऊस लांबणीवर गेल्याने पिके जळून गेली होती. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले होते. मात्र, रब्बी हंगामातील पिकांची लागवड, पेरणी यामुळे होणार आहे. तसेच, द्राक्षे व डाळिंबाच्या बागांनाही याचा फायदा होईल. डाळिंबाच्या हस्तबहाराची छाटणी होईल. तसेच, द्राक्षांच्याही छाटणीला सुरुवात झाली आहे. समाधानकारक पाऊस नसला, तरी पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्याची शेतकरी वर्गाला आशा आहे.