हैदराबाद- तेलंगानाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. येथे रात्री उशीरा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे रस्त्यांवरही अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. यादरम्यान दोन लोक नाल्यातही वाहून गेल्याचे समजते. त्यांचा शोध सुरू आहे. तसेच, पुढील 24 तासांत हैदराबादसह तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हैदराबादच्या हवामान खात्याने म्हटले आहे. (Heavy rain in Telangana Hayderabad)
ओल्ड सिटीच्या रेस्टॉरंटमध्ये घुसलं पाणी -हैदराबादमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर, पावसाचे पाणी ओल्ड सिटीतील एका रेस्टॉरंटमध्ये घुसले. तसेच या भागातील अनेक घरांतही पाणी शिरले. यावरून पावसानंतर येथील परिस्थिती कशी असेल, याचा अंदाज येऊ शकतो.
नाल्यात वाहून गेलेल्या लोकांचा शोध सुरू - एसीपीपावसानंतर, हैदराबादमधील वनस्थलीपुरमच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. हे रस्ते ओलांडण्यासाठी लोक संघर्ष करताना दिसून आले. या भागातील एसीपी के. पुरुषोत्तम यांनी दिलेल्या माहितीनसुरा, "मुसळधार पावसामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने दोन जण वाहून गेले आहेत. बचाव पथक त्यांचा शोध घेत आहे."
पुढील 24 तास अशी असेल देशाची स्थिती?भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, पुढील २४ तासांत गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, अंदमान-निकोबार, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तसेच गोवा, आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.