बंगळुरूमध्ये आज मुसळधार पाऊस झाला. या पावसाने कहर केला आहे. पावसामुळे बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे. या इमारतीमध्ये अनेक मजूर अडकल्याची भीती आहे.बंगळुरू पूर्व येथील होरामवू आग्रा भागात ही घटना घडली असून आपत्कालीन सेवा कामगारांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
अग्निशमन आणि आपत्कालीन विभागाच्या दोन रेस्क्यू व्हॅन बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इमारतीत १७ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि इतर एजन्सींच्या मदतीने समन्वित प्रयत्नात बचाव कार्य केले जात आहे. प्राथमिक तपासानुसार संपूर्ण इमारत कोसळली यामुळे काम करणारे मजूर अडकले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.एनडीआरफ मदतकार्य करत आहे, पाच तुकड्या शहरात अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उत्तर बंगळुरुसह आजूबाजूच्या अनेक भागात सर्वाधिक फटका बसला आहे. मध्य विहार कंबरभर पाण्याने भरले आहे. बचाव कर्मचाऱ्यांनी बोटीच्या मदतीने लोकांना बाहेर काढले.
उत्तर बंगळुरूमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक प्रवाशांची फ्लाइट, ट्रेन आणि बस चुकल्या आहेत. पाणी साचल्यामुळे शाळेंना सुट्ट्या दिल्या आहेत.