नवी दिल्ली: भारतीय हवामान खात्याने येत्या पाच दिवसांत मुंबई आणि गोव्यासह इतर अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये शनिवार-रविवार मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात रेड अलर्टमहाराष्ट्रात सलग 4 दिवसांपासून पाऊस पडत आहे. IMD ने आता मुंबई आणि गोव्यात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गुजरातेत मुसळधारIMD च्या अलर्टनुसार गुजरातमध्ये 11 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये नवसारी, वलसाड, दमण, दादर नगर हवेली, सौराष्ट्र आणि कच्छमधील जामनगर, जुनागढ, देवभूमी द्वारका आणि दक्षिण गुजरातमधील कच्छ जिल्ह्यांचा समावेश आहे, जेथे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. मात्र, गुजरातमधील काही भागात आधीच पाऊस सुरू आहे. जुनागडच्या पावसानंतर पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.