गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. परिसर, घरं आणि सोसायट्या पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार जोरदार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना पुढील दोन दिवस समुद्रात न जाण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच गुरुवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआरमध्ये सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी तुंबण्याची आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जुनागडचा मानवदर पोरबंदर रोड पुराच्या पाण्याखाली गेला होता. त्यामध्ये चार जण अडकले होते. जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच राज्य आपत्ती निवारण दलाचे जवान बचाव बोटीसह घटनास्थळी पोहोचले आणि चारही जणांची सुटका केली. पावसामुळे गुजरातमधील वडोदरातील अकोटा स्टेडियम परिसर जलमय झाला आहे. पाणी इतके भरले की नंतर घराच्या छतावर एक मगर दिसली.
अहमदाबादमध्ये देखील असंच चित्र पहायला मिळत आहे. निवासी भागात मगर फिरताना दिसत आहेत. नवागाम घेडे परिसरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक आमदार आणि क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा जडेजा घटनास्थळी पोहोचल्या आणि लोकांना मदत केली. रहिवासी भागात पाणी इतक्या वेगाने आले की लोकांना बाहेर पडायला वेळ मिळाला नाही.
गुजरातमध्ये पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये आणखी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे तीन दिवसांत पावसामुळं जीव गमावणाऱ्यांची संख्या २६ झाली आहे. याचबरोबर, आतापर्यंत पूरग्रस्त भागातून १७,८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मोरबी जिल्ह्यातील हलवद तालुक्यातील धवना गावाजवळ पूल ओलांडताना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्या सात जणांचा मृत्यू झाला. या पुलावरून पाणी वाहत होते. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.