बंगळुरु : केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवलेला असतानाच शेजारच्या कर्नाटकमध्येही पावसाने काल थैमान घातले. कोडगू जिल्ह्यामध्ये जवळपास 11 हजार घरांचे नुकसान झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बँकांना एटीएममध्ये पुरेसे पैसे ठेवण्यास सांगण्यात आल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी . कुमारस्वामी यांनी सांगितले.
शुक्रवारी कर्नाटकसह महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुमारस्वामी यांनी सांगितले की, कोडगूमध्ये जवळपास 1000 जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एनडीआरएफ, नौदल, लष्कर आणि अग्निशामक दलाच्या जवानांचा समावेश आहे. हवाई दलाकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना कोडगू जिल्ह्यामध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वाहून गेलेल्या रस्त्यांची पाहणी केली जात असून तताडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. कालच्या पावसात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दुपारी हेलिकॉप्टरमधून भूस्खलन आणि पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.