लखनौ : उत्तर प्रदेशात शुक्रवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने ४७ जणांचा बळी घेतला आहे. या पावसाने लखनौसह अनेक शहरांमध्ये प्रचंड पाणी तुंबले असून, ग्रामीण भागांतील असंख्य घरांमध्येही पाणी शिरले आहे.या पावसामुळे शनिवारी सर्व शिक्षण संस्थांना सुटी देण्यात आली. पावसाचा जोर इतका होता की, त्यामुळे अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत आणि हजारो लोक बेघर झाले आहेत, असे सांगण्यात आले. रस्त्यांवर तुंबलेल्या पाण्यामुळे वाहनेही अडकून पडली आहेत आणि लोकांना त्या पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. लखनौ, प्रतापगड, वाराणसी, प्रयागराज, रायबरेली, बाराबंकी, मिर्झापूर, महोबा, कानपूर, चंदोली गोरखपूर, सोनभद्र, अयोध्या, सहारणपूर, जौनपूर, कौशंबी आणि आझमगढ या १७ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पावसाने धुमाकूळ घातला.विजा पडून, घरे कोसळल्याने, साप चावल्याने, तसेच पुराच्या पाण्यात बुडाल्याने ४७ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पुढील दोन दिवसांत या १७, तसेच आसपासच्या आणखी काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.पावसाने बेघर झालेल्यांना, तसेच पूरग्रस्तांना ताबडतोब मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. महसूल आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयांत थांबून संबंधितांना साह्य करावे, असे त्यांनी सांगितले आहे. (वृत्तसंस्था)बिहारमध्ये १३ जिल्ह्यांत रेड अलर्टपाटणा : बिहारमध्ये शुक्रवारपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. संततधार अशीच सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने बिहारमधील १३ जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.पाटणा शहरात तुफानी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या शहरातील राजेंद्रनगर, कंकारबाग, कदम कुंआ, पाटलीपुत्र कॉलनी या भागांमध्ये पावसाचे पाणी घरांत घुसले आहे. त्यामुळे लोकांनी आपले बस्तान घराच्या वरच्या मजल्यावर किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. जोरदार पावसामुळे या भागांतील फोन व मोबाईल सेवा बंद पडली आहे, तसेच शुक्रवार रात्रीपासून वीजपुरवठाही खंडित झाला असून, तो लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पावसाचा तडाखा बसलेल्या भागांत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. गया-कोदेरमा, आरा-सासाराम, समस्तीपूर-दरभंगादरम्यानची रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली आहे. बिहारच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने उत्तर बिहारमधील १३ जिल्ह्यांत रेड अलर्टचा इशारा दिला आहे. कोणत्याही विपरीत स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. गंगा, गंडक नद्यांची जलपातळी वाढत असून, काही ठिकाणी त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राज्याच्या जलस्रोत खात्यानेही सतर्क राहण्याचा इशारा दिलाआहे. (वृत्तसंस्था)रुग्णालयांतही पाणीपाटणामध्ये काही रुग्णालयांतील वॉर्डांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रुग्णांचे खूप हाल झाले. राजेंद्रनगरमधील एक डॉक्टर अतुलकुमार यांनी सांगितले की, सतत कोसळणाºया पावसामुळे शहरांत साचलेल्या पाण्याचा नीट निचरा होत नसल्याने व पाऊस विश्रांती घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने ४७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 4:59 AM