देहरादून : उत्तराखंडमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे राज्यातील प्रमुख शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्ते वाहतूकीला फटका बसला आहे. याचबरोबर, नाचनीमध्ये रामगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने येथील पूल वाहून गेला. यामध्ये काही दुचाकी गाड्या सुद्धा वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या पावसात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. येथील रिस्पना नदीजवळ असलेल्या घरांमध्ये पाणी भरण्याची सूचना देण्यात आली आहे. कुमाऊंमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे येथील महामार्ग बंद करण्यात आला आहे. याचबरोबर, आज सकाळी साडेपाचच्या सुमारास देहरादूनच्या वसंत विहारला नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली, की शास्त्रीनगरच्या खाला परिसरातील एका घरातील काही जण घरामध्ये अडकले होते. मात्र, ही माहिती मिळाल्यानंतर वसंत विहार पोलिसांनी आवश्यक साधनसामग्रीसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले. पोलिसांनी या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 6 जणांना बाहेर काढले. यातील 4 जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:17 PM