डेहराडून: मुसळधार पावसामुळे उत्तराखंड पुन्हा एकदा उध्वस्त झालंय. ठिकठिकाणी भूस्खलनामुळे किमान 6 जणांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यासह, रामनगरमधील कोसी नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ झाल्यामुळे, अनेक रिसॉर्ट्समध्ये पाणी भरलं आहे. नैनीतालमधील रामगढचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्याने अनेक लोक मदतीची याचना करत आहेत. तसेच अल्मोडामध्ये काही लोक घराच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, पण परिस्थिती इतकी वाईट आहे की बचाव पथकांनाही तिथे पोहोचण्यास अडचण येत आहे.
पौरीच्या लान्सडाउनमध्ये एका नेपाळी कुटुंबातील 3 लोकांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, चंपावत जिल्ह्यात अशाच एका अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यातील कानपूरहून आलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आले असून चार धाम यात्राही बंद करण्यात आली आहे.
रामगढमध्ये, नैनीताल, अल्मोडामध्ये हाहाकारमुसळधार पावसामुळे नैनीतालमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे नैनीतालमधील 9 रस्ते बंद झाले आहेत, तर नैनीताल भोवली, काळधुंगी नैनीताल रस्त्यावर ढिगारा पडल्याने तो बंद झाला आहे. तर, नैनीताल हल्दवानी रस्ताही बंद झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतरही रस्त्यावर जामची परिस्थिती आहे, त्यामुळे अनेक पर्यटक परत येत आहेत, यामुळे धोका निर्माण झाला आहे.
आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
डेहराडूनमध्ये थोडा पाऊस कमी झाला आहे, तर गढवालमध्ये पाऊस थांबला आहे. पण, कुमाऊं विभागात पाऊस पडत आहे. रुद्रप्रयाग, केदारनाथ, ऋषिकेशमध्ये हलका पाऊस सुरू असताना धुकही पसरलंय. हवामान विभागाने मंगळवारीदेखील रेड अलर्ट जारी केला आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते. याशिवाय ताशी 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळ येण्याचीही शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ, पोलिसांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्याशिवाय जिल्हा मुख्यालय सोडू नका असे आदेश देण्यात आले आहेत.