दिल्ली, हिमाचल, पंजाबसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीत पावसाने ४१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला असून यमुना नदीला पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. १९८२ पासून यंदा प्रथमच जुलैमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला. देशभरात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत लष्कराच्या दोन जवानांसह १६ जणांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशात नद्यांना पूर आला असून या पुराच्या पाण्यात अनेक घरं वाहून गेली आहेत. या वाहून गेलेल्या घराचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. मनाली येथील ब्यास नदीच्या प्रवाहात इमारत कोसळून वाहून गेल्याचं दिसून आलं.
उत्तर भारतात पावसाचे मुसळधार आगमन झाल्यानंतर येथील नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत. काही नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशमधील किन्नौर, शिमला, कुल्लू, मंडी, बिलासपूर आणि सिरमौर जिल्ह्यातील सतलज, ब्यास आणि यमुनासह त्यांच्या उपनद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण हिमाचल प्रदेशात दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
सरकार आणि प्रशासनाने स्थानिक यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या असून धैर्य बाळगण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. आपत्कालीन मदतीसाठी १०७७ हा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. दरम्यान, ब्यास नदीच्या प्रवाहात नदीशेजारी असलेली एक इमारत कोसळल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ही इमारत कोसळून चक्क नदीच्या प्रवाहात वाहून गेलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हिमाचल प्रदेशमधील पूरस्थिती दर्शवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहे.