पावसामुळे बद्रिनाथ, केदारनाथ मार्ग ठप्प; ५,८०० यात्रेकरू जम्मूहून अमरनाथला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 08:34 AM2024-07-07T08:34:38+5:302024-07-07T08:34:49+5:30

हिमालयाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Heavy rains have disrupted life in many parts of the Himalayas | पावसामुळे बद्रिनाथ, केदारनाथ मार्ग ठप्प; ५,८०० यात्रेकरू जम्मूहून अमरनाथला रवाना

पावसामुळे बद्रिनाथ, केदारनाथ मार्ग ठप्प; ५,८०० यात्रेकरू जम्मूहून अमरनाथला रवाना

जम्मू : पावसाने जोर धरलेला असतानाही शनिवारी पहाटे ५,८०० यात्रेकरूंचा एक जत्था जम्मू येथील २ तळशिबिरातून अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला. दरम्यान, हिमालयाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

२४५ वाहनांचे २ वेगवेगळे ताफे शनिवारी पहाटे जम्मूहून अमरनाथला रवाना झाले. एक ताफा पहाटेपूर्वी २:५० वाजता आणि दुसरा ताफा पहाटे ३:५० वा. रवाना झाला. अमरनाथ यात्रेला रवाना झालेला हा यंदाचा ९वा जत्था असून जम्मूच्या भगवतीनगर तळशिबिरातून तो मार्गस्थ झाला.

सकाळी स्थगित केली होती यात्रा

दरम्यान, मधून मधून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे शनिवारी सकाळी बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरील अमरनाथ यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.

दरडी कोसळून चमोलीत २ भाविकांचा मृत्यू

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात शनिवारी दरडी कोसळून हैदराबादहून आलेल्या २ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील गौचर व कर्णप्रयाग यांच्यामध्ये चटवापीपलजवळ ही दुर्घटना घडली. शेजारच्या पहाडाचा मोठा भाग महामार्गावर कोसळला. त्यात ढिगाऱ्याखाली दबून २ जणांचा मृत्यू झाला. निर्मल शाही (३६) आणि सत्यनारायण (५०) अशी मृतांची नावे आहेत. बद्रिनाथ यात्रा करून परतत असताना त्यांना मृत्यूने गाठले.
 

Web Title: Heavy rains have disrupted life in many parts of the Himalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.