शिमला/जम्मू/चंडीगड/लखनौ : उत्तर भारतात मुसळधार पावसाने पुन्हा थैमान घातले आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलाच्या एका गावात शनिवारी सकाळी लैला नदीला अचानक आलेल्या पुरात ढाबा वाहून गेल्याने एक वृद्ध जोडपे आणि त्यांचा नातू मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे, तर जम्मू-श्रीनगर महामार्गावर दोन ठिकाणी भूस्खलन झाले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोहडू भागातील बडियारा गावात ढगफुटी झाली. त्यात वाहून गेलेल्या तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. हिमाचल प्रदेशात शुक्रवारपासून मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील ६५६ रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. १६७३ ट्रान्स्फाॅर्मर खराब झाले आहेत. शिमलाजवळ काही ठिकाणी रस्त्यांना तडा गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मनालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली.
उत्तर प्रदेशात नदीच्या प्रवाहात बस अडकली, ४० प्रवाशांची सुटका
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर असलेल्या बिजनौर जिल्ह्यातील मंडावली भागात कोटावली नदीच्या प्रवाहात राज्य परिवहन महामंडळाची बस अडकली. यातील ४० प्रवाशांची सुटका करण्यात यश आले आहे. ही बस ४० प्रवाशांसह हरिद्वारला जात होती. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला.
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस
अतिवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मेहर आणि दलवास भागात भूस्खलन झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ढिगारा हटवल्यानंतर महामार्गावर वाहनांची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. डोडाजवळ ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यादरम्यान ३४७२ यात्रेकरूंची २०वी तुकडी जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्प येथून १३२ वाहनांनी शनिवारी पहाटे काश्मीरला रवाना झाली.
यमुनेची पाणीपातळी धोक्याच्या चिन्हाखाली
दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी शनिवारी धोक्याच्या चिन्हाच्या खाली गेली आणि गेल्या काही दिवसांपासून ती २०५.३३ मीटरच्या आसपास आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २५ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. हरयाणातील हथिनीकुंड धरणाची पातळी वाढली गेल्या २४ तासांत पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांत झालेल्या पावसामुळे हथिनीकुंड धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. धरणाच्या पाण्याचा प्रवाह अडिच लाख क्युसेकवर पोहोचला.