उत्तराखंड, हिमाचल अन् दिल्लीत पावसाचे थैमान; यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण, अनेकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 08:45 AM2023-07-10T08:45:58+5:302023-07-10T08:50:01+5:30
दिल्लीत अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली.
नवी दिल्ली: उत्तर भारतात मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. दिल्ली, हिमाचल, उत्तराखंडसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीत पावसाने ४१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९८२ पासून जुलैमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक १५३ मिमी पाऊस झाला. देशभरात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत लष्कराच्या दोन जवानांसह १६ जणांचा मृत्यू झाला. यमुनेसह बहुतेक नद्यांना उधाण आले आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी सोमवारी शाळांना सुटी देण्यात आली.
उत्तराखंडची परिस्थिती सुद्धा सारखीच आहे. राज्यात गेल्या २४ तासांत सरासरीपेक्षा २.५ ते ३ पट जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असून चार धाम यात्रेलाही अडथळा निर्माण होत आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत लोकांना अनावश्यक हालचाली टाळण्यास सांगितले.
हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे २५० हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली. कोटगढच्या माधवनी पंचायतीच्या पानेवली गावात एका घरावर दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, इतर दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू झाला. पुरामुळे अनेक ठिकाणचे पूलही वाहून गेले आहेत. उत्तर रेल्वेनुसार सुमारे १७ गाड्या रद्द करण्यात आल्या, तर बारांचा मार्ग वळवण्यात आला. हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, हमीरपूर, कुल्लू, मंडी येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोलन, शिमला, सिरमौरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून लाहौल स्पितीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाहौल स्पितीच्या लोसारमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे
राजधानीत यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दिल्लीच्या जुन्या लोखंडी पुलाजवळ यमुना धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १ वाजता यमुनेची पाण्याची पातळी २०३.१८ मीटर होती. इशारा पातळी २०४.५ मीटर आहे, जी मंगळवारी २०५.३३ मीटर पार करेल. त्यामुळे राजधानीतील सखल भागात पुराचा धोका वाढला असून त्यामुळे येथील सुमारे ३७ हजार लोक प्रभावित होऊ शकतात. दुसरीकडे हरियाणातून आणखी पाणी सोडल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते.
यात्रेकरूंची जीप नदीत पडली
ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर गुलरजवळ दरड कोसळल्याने तीन भाविकांची जीप नदीत पडल्याने गंगेत बुडाले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीपमध्ये ११ जण होते. त्यांनी सांगितले की, पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर इतर तिघांचा शोध सुरू असून बचाव कर्मचार्यांनी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. राज्याच्या काशीपूर भागात दोन घरे कोसळून एका जोडप्याचा मृत्यू झाला, तर त्यांची नात जखमी झाली, तर उत्तरकाशी जिल्ह्यातील बरकोट येथील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्थापनात गुंतलेल्या एका पोलिसाचा डोंगरावरून पडलेल्या दगडाचा धक्का लागून मृत्यू झाला.