लेह - पंतप्रधान नरेंद्र मोदींना अचानक लेह दौरा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मोदींनी लेह लडाख सीमारेषेवरु जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलंय. मोदींनी सीमारेषेवरील तैनात जवानांना संबोधित करताना, आपलं शौर्य हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं असल्याचं म्हटलंय. जगभराने आपलं शौर्य पाहिलं असून घराघरात आपल्या शौर्याच्या कथा सांगितल्या जात आहेत. देशाला आपला अभिमान असून आपल्या पराक्रमाची गाथा सर्वत्र गायिली जात असल्याचं मोदींनी म्हटलं.
लडाख सीमारेषेवरील भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर चीनने पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. यावेळी, मोदींनी सैन्याला संबोधित करत, त्यांना धीर देत देशाची 130 कोटी जनता आपल्यासोबत असल्याचे म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार असल्याचे मोदींनी म्हटले.
देशवासियांना देशाच्या जवानांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. आज मी माझ्या वाणीतून आपला जयघोष करतोय, गलवान घाटीत शहीद झालेल्या देशातील जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जवान आपलं शौर्य दाखवत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली आहे, देशवासियांनी आपल्यासमोर नतमस्तक केलंय. गलवान खोऱ्यातील नदी, पर्वत, खोऱ्यातील कानाकोपरा देशातील जवानांच्या पराक्रमाची गाथा गात आहे. देशातील 130 कोटी भारतीयांच्या सन्मानाचा हा पराक्रम आहे, देशासाठी बलिदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांची ही भूमी आहे. आपण त्याच भारतमातेचे वीर आहात, ज्या भारतमातेने आजपर्यंत हजारो आक्रमकांना चोख प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्र आणि मानवतेच्या प्रगतीसाठी शांतीप्रिय असणे गरजेचं असतं. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण कुणी आम्हाला डिवचलं तर, उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, असे म्हणत थेट सीमारेषेवरुनच मोदींनी चीनला स्पष्ट संदेश दिला आहे.