उत्तरकाशी - उत्तराखंडमध्ये पूरग्रस्त भागात मदतकार्य करणारं हेलिकॉप्टर बुधवारी (21 ऑगस्ट) कोसळल्याची घटना समोर आली आहे. उत्तरकाशीमध्ये सकाळी हे हेलिकॉप्टर कोसळलं. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. मोरीहून मोलदी येथे हे हेलिकॉप्टर मदत साहित्य घेऊन चालले होते. त्याचवेळी केबलमध्ये अडकून हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना साहित्य पोहचवण्यात येत आहे. याच दरम्यान उत्तरकाशीमध्ये पूरग्रस्त भागात मदतकार्य करणारं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. यामधील तिघांचा मृत्यू झाला आहे.
दोरी तुटली अन्... जम्मूतील तवी नदीत एअर फोर्सचं जबरदस्त 'रेस्क्यू ऑपरेशन', दोघांना वाचवलं!
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुरात अडकलेल्या लोकांना सेना आणि एनडीआरएफचे जवान शक्य तेवढी मदत करतायत. अनेक ठिकाणी जवानांनी राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशननं अनेकांचे प्राण बचावले आहेत. जम्मू-काश्मीरमधल्या तवी नदीमध्ये बुडणाऱ्या दोघांचे प्राण वाचवण्यासाठी हवाई दलानं राबवलेलं रेस्क्यू ऑपरेशन चित्तथरारक होतं. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून जम्मूतल्या तवी नदीमध्ये जवानानं उतरून अडकलेल्या दोघांना सुखरूपरीत्या वाचवलं आहे. पहिल्यांदा जेव्हा जवानांनी हेलिकॉप्टरमधून दोरी खाली सोडली, त्यावेळी त्या दोघांनी ती पकडली असतानाच तुटली, त्यामुळे ते दोघेही पुन्हा नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागले. जम्मूतल्या तवी नदीमध्ये जवानांनी राबवलेले हे ऑपरेशन थक्क करणारं होतं. हवाई दलाच्या जवानांनी जबरदस्त साहस दाखवत दोन जणांना सुखरूप वाचवल्याची घटना याआधी घडली आहे.
तवी नदीमध्ये चार जण अडकले होते. यातील दोघांना हेलिकॉप्टरमधून दोरी टाकून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ती दोरी तुटल्यानं ते पुन्हा नदीत पडले आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागले. ते दोघेही नदीतल्या एका पीलरवर चढण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर उर्वरित दोघांना वाचवण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं. हवाई दलाचा जवान हेलिकॉप्टरमधून खाली उतरला आणि त्यानं अडकलेल्या दोघांना दोरीला बांधून हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यू केलं. त्यानंतर जवान तिथेच बसून राहिला. जवानाला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पुन्हा आलं. जवानासाठी दोरी टाकली आणि जवान दोरी पकडून पुन्हा सुखरूप वर आला. या पूर्ण मोहिमेत लष्करानं चित्तथरारक साहसाचं दर्शन घडवलं.