कटरा (जम्मू) : वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर भाविकांना परत घेऊन येणारे खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर हवेत अचानक आग लागल्यानंतर कटरा येथे कोसळले. या अपघातात वैमानिक आणि नवविवाहित जोडप्यासह सर्व सातही जण जागीच ठार झाले. पक्ष्याची धडक लागल्यामुळे हे हेलिकॉप्टर आग लागून कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.हिमालयन हेली सर्व्हिसेसच्या या हेलिकॉप्टरने त्रिकूट हिल्सच्या सांजीछट हेलिपॅडवरून सहा भाविकांसह उड्डाण केले होते. हेलिकॉप्टरला उड्डाणानंतर लगेच हवेतच आग लागली व ते भर वस्तीत कोसळू नये यासाठी वैमानिकाने प्रयत्नांची शिकस्त केली. शेवटी हेलिकॉप्टर कटरा येथील न्यू बस स्टँडजवळ कोसळले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक दानिश राणा यांनी दिली. डीजीसीएने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पक्ष्याची धडक बसल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज असला तरी चौकशीनंतरच खरे कारण कळेल, असे राणा म्हणाले. जम्मूचे रहिवासी अर्जुन सिंग, महेश आणि वंदना आणि दिल्लीचे अक्षिता (५), सचिन व आर्यनजीत अशी मृतांची नावे आहेत. तर हैदराबादच्या सुनीता विजयन असे वैमानिकाचे नाव आहे. त्यांचे जळालेले मृतदेह हेलिकॉप्टरच्या मलब्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. वैष्णोदेवी दर्शनाला जाण्यासाठी अनेक भाविक हेलिकॉप्टरचा वापर करतात. हे मंदिर त्रिकूट हिल्समध्ये ५३०० फूट उंचीवर आहे. (वृत्तसंस्था)
हेलिकॉप्टर कोसळून सात भाविक ठार
By admin | Published: November 24, 2015 12:01 AM