नवी दिल्ली - लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 12 लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. हेलिकॉप्टर जंगल परिसरात कोसळलं. त्यानंतर हेलिकॉप्टरनं पेट घेतला. या घटनेच्या चौकशीचे आदेश लष्कराकडून देण्यात आले आहेत. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत (Bipin Rawat) हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. यामध्ये 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक अधिकारी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Gp Capt Varun Singh) हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. वरुण सिंह यांनी 2020 मध्ये एका मोठ्या संकटातून तेजस लढाऊ विमानाला वाचवलं होतं. त्यांच्या या धाडसामुळेच त्यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरमधून एकूण 14 जण प्रवास करत होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. डीएनए चाचणीच्या मदतीनं 13 मृतदेहांची ओळख पटवली जाणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुपारी पाऊणच्या सुमारास तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे चॉपरचं सारथ्य होतं.
चॉपरमध्ये कोण कोण होतं?
बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते.
लष्कर वापरत असलेलं MI-17V5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. रशियन बनावटीच्या या चॉपरमध्ये दोन इंजिन असतात. व्हिआयपींच्या प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो. व्हिआयपी या चॉपरमधून उड्डाण करण्यापूर्वी अनेक प्रोटोकॉल्स पूर्ण केली जातात. विमानाची देखभाल, हवामान यांची अनेकदा पडताळणी केली जाते.