अंतानानारिओ - आफ्रिकन देश मदागास्करमधील एका बेटाच्या उत्तर-पूर्व किनाऱ्यावर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने एका मंत्र्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी तब्बल १२ तास समुद्राच्या पाण्यामध्ये पोहत राहावे लागले. अधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, हे हेलिकॉप्टर सोमवारी दुर्घटनेची शिकार झाले होते. त्यानंतर मंत्र्यांसह दोघेजण बेपत्ता झाले. हे दोघेही आपला जीव वाचवण्यासाठी तब्बल १२ तास पोहत होते.
बंदर प्राधिकरणाचे प्रमुख जीन एडमंड रेंडियनेंटेनैना यांनी सांगितले की, देशातील पोलीस राज्य सचिव सर्ज गेल आणि एक सहकारी पोलील अधिकारी मंगळवारी सकाळी किनारपट्टीवरील शहर असलेल्या महंबोमध्ये सर्च ऑपरेशनसाठी पोहोचले होते. त्यांच्याजवळच हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते.याबाबत त्यांनी सांगितले की, माझ्या मरण्याची वेळ अद्याप आलेली नाही. मात्र माझं शरीर थंड पडलंय. पण मी जखमी झालेलो नाही. सोमवारी सकाळी उत्तर पूर्व किनाऱ्यावर एका जहाजाचे अवशेष असलेल्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी ते हेलिकॉप्टरमधून गेले होते. मात्र ते कोसळले.
मदागास्करच्या पूर्वोत्तर भागात अवैधपणे १३० प्रवाशांना घेऊन जाणारे मालवाहू जहाज बुडाले होते. त्यामध्ये सुमारे १७ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच ६८ जण बेपत्ता झाले होते. मेरीटाइम अँड रिव्हर पोर्ट एजन्सीच्या एका रिपोर्टनुसार हिंदी महासागराच्या पाण्यामधून किमान ४५ जणांना वाचवण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये सांगितले की, फ्रांसिया नावाचे जहाज सोमवारी पहाटे पूर्व मनारामधील उत्तर जिल्ह्यातील अंतानांबे शहरातून निघाले होते.
मेरीटाईम अँड रिव्हर पोर्ट एजन्सीचे महासंचालक जीन एडमंड रंद्रियनेंटेना यांची सांगितले की, ते जहाज दक्षिणेकडे सोनाइराना इवोंगोच्या बंदराच्या दिशेने जात होते. हे जहाज एक मालवाहू जहाज म्हणून नोंदलेले असल्याने ते प्रवासी वाहतूक करण्यासाठी अनधिकृत होते. त्यांनी सांगितले की, जहाजाला एक छिद्र पडल्याने पाणी भरून ते बुडाले होते, असे सांगण्यात येत आहे.