ऑनलाइन लोकमत
कोट्टायम, दि. 29 - अनेकदा माणसाची योग्यता शिक्षणावर मोजली जाते. पण काहीवेळा कमी शिकलेली माणससुद्धा तज्ञांना जमणार नाही अशी मोठी काम करतात. ज्यामुळे आपण थक्क होऊन जातो. केरळच्या कांजीरापल्ली तालुक्यात रहाणा-या 54 वर्षीय डी. सदाशिवन यांनी सुद्धा पाहणा-याला आश्चर्य वाटावे अशी कामगिरी करुन दाखवली आहे.
फक्त 10 वी पर्यंत शिक्षण झालेल्या सदाशिवन यांनी स्वबळावर घरच्या अंगणात हॅलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. कांजीरापल्ली येथील खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदाशिवन यांना शाळेच्या प्रांगणात ठेवण्यासाठी एक हॅलिकॉप्टरचे डिझाईन तयार करण्यास सांगितले होते. सदाशिवन यांनी हॅलिकॉप्टरचे मॉडेल कशाला ? प्रत्यक्षात उड्डणारे हॅलिकॉप्टर का बनवू नये ? असा विचार करुन कामाला लागले.
त्यांना हे हॅलिकॉप्टर प्रत्यक्षात आणायला चारवर्ष लागली. सदाशिवन यांनी या हॉलिकॉप्टरमध्ये मारुती 800 इंजिनचा वापर केला आहे. हॅलिकॉप्टरला लागणारे दुसरे भाग कांजीरापल्लीच्या कार्यशाळेत बनवण्यात आले. हॅलिकॉप्टरच्या आतील भागामध्ये लोखंड आणि अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. ऑटोरिक्षाच्या काचेचा वापर करण्यात आला आहे.
येत्या महिन्याभरात या हॅलिकॉप्टरची उड्डाण चाचणी होणार आहे. सदाशिवन यांना उड्डाणापूर्वी विविध यंत्रणांची परवानगी घ्यावी लागेल. सदाशिवन यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले असले तरी, ते विद्यार्थ्यांच्या इंजिनीअरिंगच्या कार्यशाळा घेतात. दोनवर्षांपूर्वी केरळच्या इडुक्की जिल्ह्यात रहाणा-या साजी थॉमस यांनी अशाच प्रकारचे दोन आसनी विमान बनवले होते. स्वबळावर घरच्या अंगणात हे विमान बनवण्यासाठी त्यांना पाचवर्ष लागली होती. साजी थॉमस यांच्या प्रेरणा देणा-या आयुष्यावर आतापर्यंत दोन मल्याळी चित्रपट बनवण्यात आले आहेत.