नवी दिल्ली - २०२० च्या जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप कायम आहे. एकीकडे भारतासोबत चर्चा करत असताना दुसरीकडे चीनने लडाखमधील पँगाँग खोऱ्यामध्ये आपल्या उचापती सुरूच ठेवल्या आहेत. पँगाँग खोऱ्याबाबत भारतासोबत वाटाघाटी झाल्यानंतरही चीनने या भागात पक्की बांधकामं केली आहेत. तसंच चीनने या भागात हेलिपॅडही तयार केला आहे. सॅटेलाईट फोटोंमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हे फोटो जॅक डिट्च नावाच्या रिपोर्टरने पोस्ट केल्या आहेत. जॅक अमेरिकेच्या फॉरेन पॉलिसी मॅग्झिनसाठी काम करतात. काही फोटो समोर आले आहेत ज्या पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील आहेत. यामध्ये चिनी जेट्टी, संभाव्य हेलिपॅड्स आणि स्थायी बंकर दिसत आहेत.
पँगाँग खोऱ्यातील फिंगर ८ भागातील परिसर हा वाद निर्माण होण्यापूर्वीपासूनच चीनच्या ताब्यात आहेत. मे २०२० पासून सुरू असलेला विवाद निवळून परिस्थिती सामान्य होऊ लागल्यावर भारत आणि चीनचे सैन्य पँगाँगच्या उत्तर आणि दक्षिण भागावरून सैन्याला मागे पाठवले जाईल, यावर दोन्ही देश राजी झाले होते. मात्र आता चिनने लबाडी करून ज्या ठिकाणी तडजोड झाली आहे, अशाच भागात स्थायी बांधकाम केल्याचे समोर आलं आहे.