नवी दिल्ली - जम्मू -काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराचं एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन पायलट जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूरमध्ये पटनी टॉप भागाजवळ हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.
उधमपूरचे पोलीस उपमहानिरीक्षक सुलेमान चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना हेलिकॉप्टर कोसळ्याची माहिती मिळाली आणि शिवगड धारमध्ये घटनास्थळाकडे पथके रवाना करण्यात आली आहेत. या भागात धुक्याचं प्रमाण जास्त असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे असंही त्यांनी सांगितलं. बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून दोन जखमी पायलटना बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पटनी टॉपच्या वरच्या शिवगड धार भागातील ग्रीनटॉप हॉटेलजवळ डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं. नागरिकांकडून या घटनेची सूचना मिळाल्यानंतर तातडीनं सैन्य अधिकारी आणि जवान घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या दुर्घटनेत मुख्य पायलट आणि सहकारी पायलट गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.