हॅलो 2- खलाशांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात खास कक्ष - आवेर्तान
By admin | Published: August 17, 2015 10:38 PM
खलाशांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात खास कक्ष : आवेर्तान
खलाशांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात खास कक्ष : आवेर्तान मडगाव : कामगार प्रशासन सोपे करण्याच्या हेतूने सर्व कामगार कायद्यांमध्ये ऑनलाईन रिटर्न योजना तसेच दक्षिण गोव्यातील खलाशांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात खास कक्ष सुरू करण्यासंबंधी प्रयत्न सुरू असल्याची घोषणा कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी केली.दक्षिण गोवा जिल्हा पातळीवर सरकारी स्तरावर आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहण केल्यावर ते बोलत होते. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस खात्यामध्ये 79 महिला पोलीस उपनिरीक्षक तर 221 महिला पोलीस शिपाई अशी पदनिर्मिती केल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी आमदार कायतू सिल्वा, आमदार बेंजामिन सिल्वा, मडगावचे नगराध्यक्ष आथरूर डिसिल्वा, जिल्हाधिकारी डॉ. सचिन शिंदे, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, मुख्याधिकारी यशवंत तावडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आवेर्तान फुर्तादो म्हणाले की, दक्षिण गोव्यामध्ये खास पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे. त्यानंतर दक्षिण गोव्यातील लोकांना पासपोर्टसाठी पणजीला जाण्याची गरज भासणार नाही. कामगारवर्गाचे हित लक्षात घेऊन कामगार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच कामगारांचे किमान वेतन वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. कामगार प्रशासनसुध्दा सोपे करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्याचाच एक प्रयत्न म्हणून सर्व कामगार कायद्यांमध्ये सिंगल ऑनलाईन रिटर्न सेवा सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शांतीनगर-फोंडा येथे दरड कोसळल्यावेळी लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे फोंडा नगरपालिकेचे कामगार मंगेश खेडेकर, उद्देश गावडे व राहुल गावडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच येथील आयोग्य केंद्र व मडगाव वाहतूक कक्षाने आयोजित केलेल्या जागृती प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. (प्रतिनिधी)फोटो - आवेर्तान फुर्तादो