सलाम! १४ तासांचे अंतर फक्त सात तासात कापून वाचवले चिमुकल्याचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 06:43 PM2017-11-17T18:43:17+5:302017-11-19T08:42:24+5:30
एका महिन्याभराच्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी आणि अॅम्ब्युलन्सच्या चालकाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे.
बंगळुरु - एका महिन्याभराच्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी आणि अॅम्ब्युलन्सच्या चालकाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. या बाळाचा जीव वाचविण्यासाठी अॅम्ब्युलन्सच्या चालकाने पोलिसांच्या मदतीने तब्बल ५१६ किमीचे अंतर अवघ्या सात तासांत पार केलं. केरळ पोलिस आणि अॅम्ब्युलन्सच्या चालकाने ही अशक्यप्राय गोष्ट केली आहे.
फातिमा लाबिया या 31 दिवसांच्या बाळाला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिच्या श्वसननलिकेवर व हृदयावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यासाठी फातिमाला कन्नूर जिल्हा रुग्णालयातून तिरुवनंतपुरम येथील श्री चित्र मिशन रूग्णालयात हलवायचे होते. सुरवातीला फातिमाला एअर अॅम्ब्युलन्सने तिरुवनंतपुरमला नेण्यात येणार होते. पण कन्नूरपासून जवळील मंगळूरू विमानतळ चार तासांच्या अंतरावर होते. तसेच एअर अॅम्ब्युलन्सची सोय करेपर्यंत पाच तास लागणार होते.
त्यामुळे श्री चित्र मिशन रुग्णालयातील व कन्नूर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी फातिमाला रस्तेमार्गे तिरुवनंतपुरमला नेण्याचे ठरविले. त्यासाठी थिमीम या अॅम्ब्युलन्सच्या चालकाची निवड करण्यात आली होती. कन्नूर ते तिरुवनंतपुरम दरम्यानचे तब्बल 14 तासांचे अंतर 7 तासांत पार केले. सदर बाळावर तिरुवनंतपुरम येथील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याचे प्राण वाचले आहेत. केरळ पोलीस व अॅम्ब्युलन्सच्या चालक तिमीमच्या या कामगिरीचे दशभरातून कौतुक होत आहेत.
केरळ पोलिसांनी अॅम्ब्युलन्ससाठी ग्रीन कॉरिडोअरची सोय करत कन्नूर ते तिरुवनंतपुरम दरम्यानच्या सर्व वाहतूक पोलिसांना अॅम्ब्युलन्स येण्याआधीच सर्व मार्ग मोकळे करून ठेवण्याचे आदेश दिले होते. अॅम्ब्युलन्समध्ये दोन डॉक्टर, फातिमाचे आई वडील प्रवास करत होते तर सोबत पोलिसांच्या दोन एसयूव्ही गाड्या पुढे मागे धावत होत्या. कन्नूर ते तिरुवनंतपुरम दरम्यानच्या तीन जिल्ह्यात पोलिसांच्या गाड्या बदलल्या मात्र अॅम्ब्युलन्स चालक थिमीमने मात्र सलग गाडी चालवली. थिमिमने कन्नूर ते तिरुवनंतपुरम दरम्यानचे 516 किमी अंतर ज्याला साधारणत: 14 तास लागतात ते अवघ्या 6 तास 45 मिनीटात पार केले.