नवी दिल्ली : दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चार वर्षे वयाखालील बालकांना हेल्मेट घालणे व त्यांच्यासाठी सेफ्टी हर्नेसचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नवीन नियमांची अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने बुधवारी जारी केली.
या नव्या नियमात म्हटले आहे की, चार वर्षे वयाखालील बालकांना घेऊन जाताना दुचाकीचा वेग ताशी ४० किमीपेक्षा अधिक असता कामा नये. केंद्रीय मोटर वाहन (दुसरी दुरुस्ती) नियम, २०२२ हा कायदा प्रकाशित केल्यानंतर एक वर्षाने त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. चार वर्षे वयाखालील बालकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चार वर्षे वयाखालील बालकाला घातलेला सेफ्टी हर्नेस दुचाकी चालविणाऱ्यालाही पट्ट्याने जोडलेला असावा. त्यामुळे या बालकाची सुरक्षितता आणखी वाढते असे या नव्या नियमांत म्हटले आहे.
दुचाकीवरून प्रवास करताना अपघात झाल्यास गंभीर इजा होण्याची शक्यता अधिक असते. दुचाकी चालवणारा व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीसाठी हेल्मेट बंधनकारक आहे. मात्र अनेकदा दुचाकीस्वार चार वर्षे वयाखालील बालकांनाही घेऊन प्रवास करतात. त्या बालकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.