- हरिश गुप्ता नवी दिल्ली : दिल्लीतील अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तोडीची नवी अत्याधुनिक रुग्णालये नागपूरसह देशात ११ ठिकाणी सुरु करण्याची घोषणा मोदी सरकारने केली खरी पण प्रत्यक्षात त्या दिशेने अत्यंत धीम्या गतीने काम सुरु आहे. गेल्या चार वर्षांत या रुग्णालयांसाठी १४,८१५ कोटी रुपये केंद्राने मंजूर केले असले तरी त्यापैकी फक्त ४०५.१८ कोटी रुपयेच आजवर मिळू शकले आहेत.नागपूर ‘एम्स’साठी २०१४-१५ या वर्षात १,५७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, पण त्यापैकी आत्तापर्यंत फक्त ५४.८४ लाख रुपये एवढीच रक्कम उपलब्ध झाली आहे.नागपूरच्या ‘एम्स’साठी निधी मंजूर होऊनही दोन वर्षांमध्ये प्रत्यक्ष पदरात काहीच पडले नव्हते. त्यानंतर २०१६-१७ साली २० कोटी रुपये मंजूर झाले. त्यानंतर २०१७-१८ या कालावधीत ३४.८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.हा प्रकल्प फेब्रुवारी २०२०मध्ये पूर्ण करण्याचे निर्धारित लक्ष्य केंद्र सरकारच्या कासवगती कारभारामुळे पूर्ण होणे अशक्य आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे नागपूरचे असूनही तेथील प्रकल्पाला केंद्राकडून वेळेवर निधी मिळालेला नाही.यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी अलीकडेच लोकसभेत माहिती सादर केली. सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात उभारल्या जाणाऱ्या ‘एम्स’ रुग्णालयाला गेल्या दोन वर्षांपासून केंद्राने निधीच दिलेला नाही. या प्रकल्पाकरिता मंजूर झालेल्या ८२३ कोटी रुपयांपैैकी फक्त १०४ कोटी रुपयेच मिळाले आहेत.मंगलगिरी येथील ‘एम्स’साठी फक्त ५४.८४ कोटी रुपये आजवर देण्यात आले असून तोही वेळेत पूर्ण होण्याची आशा नाही. खुद्द जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशमधील आहेत तरी त्या राज्यातील विलासपूरच्या नव्या ‘एम्स’साठी केंद्राने आजवर एक पैसाही दिलेला नाही.>यूपीए काळातील कामे पूर्णयूपीए सरकारच्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या सहा ‘एम्स’ रुग्णालयांपैैकी भोपाळ (मध्य प्रदेश), रायपूर (छत्तीसगड), जोधपूर (राजस्थान) येथील रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, तेथे कामही सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे येत्या जून किंवा जुलै महिन्यात उद््घाटन करतील. मात्र, तेथे कर्मचारीवर्गाची संख्या अपुरी आहे. भुवनेश्वर, विजयपूर (जम्मू) व ऋषिकेश येथील नवी ‘एम्स’ रुग्णालये येत्या काही महिन्यांत बांधून पूर्ण होतील.
नागपूरसह ११ नव्या ‘एम्स’ची निधीअभावी परवड, मोदी सरकारचा कासवगती कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:57 AM