नवी दिल्ली : दरतासाला ११ मुले बेपत्ता होतात. या मुलांचा शोध घेणे अगोदरच मानसिक त्रास सहन करीत असलेल्या त्यांच्या पालकांसाठी कठीण काम असते. या पार्श्वभूमीवर बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पालकांना मदत व्हावी म्हणून सरकार येत्या मंगळवारी एका संकेतस्थळाचे लोकार्पण करणार आहे.सरकारी संकेतस्थळाच्या माध्यमातून संबंधितांना बेपत्ता मुलाबाबत थेट माहिती देता येते, त्याच्याबाबत अद्ययावत माहिती मिळवता येईल आणि माहिती अपलोड करता येणार आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट खोयापाया डॉट जीओव्ही डॉट इन नामक या संकेतस्थळावर (वेबसाईट) एखादे मुलं हरवल्यास कोणते पाऊल उचलावे यासंदर्भातील सर्व प्रश्नांचे निराकरण केले जाणार आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या मंचाच्या माध्यमातून लोकांना केवळ बेपत्ता मुलांची माहितीच देता येणार नाही, तर त्यांचा शोध घेण्याच्या दिशेने कोणती पावले उचलावीत याचीही माहिती प्राप्त होऊ शकेल. मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एखादे मूल बेपत्ता झाल्यास काय करावे, याबाबत कोणतीही ठोस माहिती पालकांना मिळत नाही. याबाबत पोलीस खूप महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)