मथुरा : उत्तर प्रदेशच्या मथुरेतील हिंसाचारग्रस्त जवाहरबागमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी येथे पोहोचलेल्या या क्षेत्राच्या भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांना पोलिसांनी तेथे जाण्यापासून रोखले. उत्तर प्रदेश सरकारने मथुरेतील कायदा-व्यवस्थेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हेमा मालिनी यांनी केली. एका पोलीस अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, हेमा मालिनी यांना रोखण्यामागे कुठलाही विशिष्ट हेतू नाही. अद्याप हा संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित करण्यात आलेला नाही. पोलीस आणि विशेषज्ञांचे पथक आणखी कुठे स्फोटके दडवून ठेवली आहेत काय याची कसून तपासणी करीत आहे. अशात एखादा व्हीआयपी अथवा अन्य व्यक्तीसोबत काही दुर्घटना घडली तर कठीण होईल. गुरुवारी जवाहरबाग परिसरात पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांमध्ये उडालेल्या चकमकीत २ पोलीस अधिकारी शहीद तर अन्य २२ लोक मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर हेमा मालिनी यांनी टिष्ट्वटरवर आपल्या सिनेमाच्या चित्रीकरणाचे फोटो टाकल्याने टीकेची झोड उठली होती. मथुरेच्या जवाहरबागमध्ये पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर शनिवारी येथील परिस्थिती सामान्य होती. या अतिक्रमणकर्त्यांचे नेतृत्व करणारा रामवृक्ष यादव याच्या मृतदेहाची ओळख पटली आहे.
हिंसाचारग्रस्त भागात हेमा मालिनींना नो एन्ट्री
By admin | Published: June 05, 2016 4:01 AM