मुंबई - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा 93 वा वाढदिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेत्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे. राजकारणासोबत साहित्य, कविता आणि चित्रपटांशीही त्यांचं खास नातं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांना हेमा मालिनी यांचा अभिनय प्रचंड आवडत होता. हेमा मालिनीचे ते मोठे चाहते होते. हेमा मालिनी यांचा 'सीता और गीता' हा चित्रपट तर त्यांना इतका आवडला होता, की त्यांनी जवळपास 25 वेळा तो पाहिला होता. इतकंच नाही, जेव्हा पहिल्यांदा त्यांची आणि हेमा मालिनीची भेट झाली तेव्हा त्यांच्याशी बोलतानाही ते घाबरत होते. स्वत: हेमा मालिनी यांनी हा खुलासा केला होता. पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती.
हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की, 'मला राजकारणात आणि खासकरुन भाजपात आणण्याचं श्रेय माझ्या एका जुना सहकारी अभिनेता आणि गुरुदासपूरचे खासदार राहिलेले विनोद खन्ना यांना जातं. 1999 मध्ये गुरुदासपूर मतदारसंघातून दुस-यांदा निवडणूक लढवणा-या विनोद खन्ना यांनी प्रचारासाठी मला बोलावलं होतं. तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी प्रचारासाठी सांगितलं होतं. आईनेही अडवाणींचं नाव ऐकून मला परवानगी दिली होती. तिनेच मला माझं पहिलं भाषण लिहून दिलं होतं. सभेसाठी झालेली गर्दी पाहून लालकृष्ण अडवाणी यांनी खूश होऊन मला बिहारमधील प्रचारासाठी आमंत्रण दिलं. यानंतर मी अनेकदा भाजपाच्या प्रचारासाठी जाऊ लागली. 2003 मध्ये त्यांनी मला राज्यसभेचं सदस्यत्व देत मोठी जबाबदारी सोपवली'.
हेमा मालिनी यांनी सांगितल्यानुसार, 'मला आठवतं मी पदाधिका-यांना म्हटलं होतं की, माझ्या भाषणात मी नेहमी अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करते, पण कधीच त्यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यांची भेट करुन द्या. यानंतर माझी आणि त्यांची भेट ठरवण्यात आली. भेटीदरम्यान अटल बिहारी वाजपेयी माझ्याशी बोलताना थोडे घाबरत असल्याचं मला जाणवलं. मी तिथे उपस्थित एका महिलेला विचारलं की काय झालंय ? अटलजी माझ्याशी नीट बोलत का नाहीयेत ? त्या महिलेने तेव्हा मला सांगितलं की, ते तुमचे प्रचंड मोठे चाहते आहेत. तुमचा 1972 मध्ये आलेला 'सीता और गीता' चित्रपट त्यांनी 25 वेळा पाहिला होता. आज अचानक तुम्हाला समोर पाहून ते घाबरले आहेत'.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 93 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी ट्विटवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
25 डिसेंबर 1924 रोजी वाजपेयी यांचा जन्म झाला. 1998 ते 2004 या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषविले. वाजपेयी यांनी आपल्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक हिंदी कविता लोकप्रिय आहेत. वाढदिवसानिमित्त अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर शुभेच्छा प्रचंड वर्षाव होत आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा कार्यकर्त्यांनी कानपूर येथे वाजपेयी यांच्यासाठी हवन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या निरोगी आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठीदेखील प्रार्थना केली.