रांची - झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा तुरुंगात छळ सुरू असून अशाच त्रासाचा सामना करावा लागलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर स्टॅन स्वामी यांचा कोठडीत मृत्यू झाला होता. स्टॅन स्वामी यांनी आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी लढा उभारला होता, असे सोरेन यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या फादर स्टॅन स्वामी यांचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्याची सुरुवात लोकसभा निवडणुकांत झारखंडमध्ये झाली आहे. हेमंत सोरेन यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या संचालनाची व्यवस्था त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन पाहतात. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, फादर स्टॅन यांनी समाजातील वंचित गटांसाठी लढा उभारला होता. मात्र त्यांचा आवाज दडपण्यात आला. तुरुंगात हेमंत सोरेन यांचा अशाच प्रकारचा छळ करण्यात येत आहे.