Hemant Soren : महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. तिथे भारतीय जनता पक्ष आणि झारखंड मुक्ती मोर्चा, यांच्यात प्रमुख लढत आहे. दरम्यान, या निवडणुकीपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वयावरुन नवा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी बारहाईत मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पाच वर्षांच्या कालावधीत त्यांचे वय सात वर्षांनी वाढले आहे. आता यावर भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे.
भाजपची सोरेन यांच्यावर टीका2019 मध्ये हेमंत यांच्या नामनिर्देशन पत्रात त्यांचे वय 42 वर्षे नमूद करण्यात आले होते, परंतु यावर्षी त्यांचे वय 49 वर्षे नमूद करण्यात आले आहे. भाजपचे म्हणणे आहे की, आता केवळ हेमंत सोरेनच सांगू शकतील की, त्यांचे 2019 मधील वय योग्य आहे की, 2024 मध्ये त्यांनी दाखल केलेले वय बरोबर आहे. 2024 मधील त्यांचे वय बरोबर असेल, तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्रावर विजय मिळवला. तसे असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न भाजपने विचारला आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांचा निशाणा आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, मी म्हणतो की हेमंत सोरेन यांचे नामांकन रद्द केले जाऊ नये. जनताच त्याचा पराभव करेल. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी म्हणाले, हेमंत सोरेन नेहमीच असे करतात. हे चुकीचे असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. किमान प्रतिज्ञापत्र तरी व्यवस्थित ठेवावे.
निवडणुका कधी होणार?झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होमार आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीतील 81 जागांसाठी 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे आणि मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल.