रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रविवारी झारखंड राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हेमंत सोरेन हे दुसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहे.
हेमंत सोरेन यांच्यासह पाकुडमधील काँग्रेसचे आमदार आलमगीर आलम यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. याआधी आलमगीर आलम यांनी झारखंड विधानसभेचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. तसेच, रामेश्वर उरांव आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सत्यानंद भोगता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी राज्यसभेचे खासदार शरद यादव, राज्यसभेचे खासदार संजय सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, सुबोध कांत सहाय, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, डीएमके नेता एमके स्टॅलिन यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
दरम्यान, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा दणदणीत पराभव झाला असून, त्या पक्षाला 25 जागांवरच विजय मिळाला आहे. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने 81 पैकी 47 जागांवर विजय मिळविला. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले. भाजपाचे नेते व मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यासह त्यांच्या पाच मंत्र्यांचा जनतेने या निवडणुकीत पराभव केला.
सोरेन दोन्ही ठिकाणी विजयीझारखंड विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन हे दुमका व बरहैट या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे ते पुत्र आहेत. हेमंत सोरेन हे अवघे 44 वर्षांचे असून, ते याआधी काही काळ राज्याचे मुख्यमंत्री होते.