Hemant Soren Arrested: कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर अखेर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. या सर्व घडामोडींमुळे झारखंडमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे.
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने चंपाई सोरेन यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यांनी ४३ आमदारांची पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सुपूर्द केली आहेत.
जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात सुनावणी होणार आहे. ईडीच्या समन्सविरोधात हेमंत सोरेन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अटकेविरोधात त्यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून हेमंत सोरेन यांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच झारखंडमधील सर्व आदिवासी संघटनांनी गुरुवारी, १ फेब्रुवारी रोजी राज्यात बंदची हाक दिली आहे. या संदर्भात पोस्टरही जारी करण्यात आले असून, त्यात हेमंत सोरेन यांचे फोटो आहे.
'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध, कोण आहेत चंपई सोरेन?
'झारखंड टायगर' म्हणून प्रसिद्ध असलेले चंपई सोरेन आता राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. चंपई सोरेन हे सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोडा गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव सिमल सोरेन असून ते शेती करायचे. चार मुलांमध्ये चंपई सर्वात मोठे आहेत. चंपई यांनी सरकारी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे लहान वयातच माणको यांच्याशी लग्न झाले. चंपई यांना ४ मुलगे आणि तीन मुली आहेत. याच काळात बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरू लागली. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपईदेखील झारखंडमधील चळवळीत सामील झाले. या काळात ते 'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध झाले. यानंतर चंपई सोरेन यांनी सरायकेला मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार बनून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले.