रांची - झारखंडमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने मनीलॉड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एका दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले.
ईडीने सोरेन यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने शुक्रवारपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला. झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना एका दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे, असे सोरेन यांची बाजू मांडणारे महाधिवक्ता राजीव रंजन यांनी सांगितले.“संपूर्ण प्रकरण चुकीच्या हेतूने चालविले गेले आहे. सरकार पाडण्याचा हा डाव आहे. माजी मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या संपूर्ण कारवाईत कोणताही पुरावा नाही. त्यांचा जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू असताना त्यांना बेकायदा अटक करण्यात आली, असे ते म्हणाले.
चंपाई यांनी घेतली राज्यपालांची भेटझारखंडमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन बुधवारी सायंकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले. झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन म्हणाले की राज्यपालांनी झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की ते लवकरच या विषयावर निर्णय घेतील. झारखंडमध्ये २० तासांपासून कोणतेही सरकार नसल्याने आम्ही राज्यपालांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. “राज्यपालांनी आम्हाला बोलावले नाही तर आम्ही पुन्हा शुक्रवारी दुपारची वेळ मागू,” असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
अटक बेकायदा, कटाचा भाग : सोरेनआपली अटक बेकायदा असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनियोजित कटाचा भाग आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयासमोरील आपल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
रांचीमधील जमिनींचा बेकायदा ताबा : ईडीझारखंडचे अटक केलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा रांचीमधील सुमारे ८.५ एकर क्षेत्रफळाची डझनभर जमिनीवर बेकायदा ताबा मिळवला असून, त्याचा बेकायदा वापर करत आहेत, तसेच मनीलाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, असा दावा ईडीने केला आहे. सोरेन यांना अटकेनंतर ईडीने त्यांची दिवसभरात सात तास चौकशी केली.