हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत भाजपाने टी राजासिंग यांच्यारुपाने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा समोर केला आहे. योगी आदित्यनाथ यांप्रमाणेच आपल्या हिंदुत्ववादी बाण्यासाठी राजासिंग यांना ओळखले जाते. तेलंगणातील प्रचारासभेत राजासिंग यांनी आपली हीच भूमिका दाखवून दिली. आपण योगींच्या पाऊलावर पाऊल टाकत असल्याचेच त्यांनी सूचवले आहे. कारण, तेलंगणात भाजपाचे सरकार येताच, हैदराबादचे नाव बदलणार असल्याची घोषणा राजासिंग यांनी एका सभेत केली.
स्वातंत्र्यपूर्व भारतात हैदराबाद संस्थान निमाजाची जहाँगिर होती. त्यावेळी भाग्य नगर शहराचे नाव बदलून हैदराबाद करण्यात आल्याचा इतिहास सांगितला जातो. मात्र, आता पुन्हा या शहराचे नाव भाग्यनगर ठेवण्याची भाजपाची मागणी आहे. ज्याप्रमाणे फैजाबादचे नाव बदलून अयोध्या, मुगलसरायचे नाव दीन दयाल उपाध्याय, अलाहाबादचे नाव प्रयागराज ठेवण्यात आले, त्याचप्रमाणे हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर ठेवण्यात येईल अशी घोषणा राजासिग यांनी केली. राजासिंग हे हैदराबादच्या घोशामहल विधानसभा मतदारंसघातून भाजपाचे उमेदवार आहेत.
राजासिंग म्हणाले की, हैदराबादचे नाव यापूर्वी भाग्यनगर होते. मात्र, 16 व्या शतकात हैदराबादमधील शासक कुतुबशाह यांनी भाग्यनगरचे नाव बदलून हैदराबाद करण्यात आलं. ज्यावेळी, भाग्यनगरचे नाव हैदराबाद करण्यात आले, त्यावेळी हिंदूंवर अत्याचार झाले, मंदिरांची तोडफोड करण्यात आली. आता, हैदराबादची जुनी ओळख आम्हाला हवी आहे. त्यामुळेच भाजपाची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव मूळ म्हणजेच भाग्यनगर ठेवले जाईल. हिंदू संस्कृतील आणि संस्कार मिटविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचं काम भाजपाचा असल्याचे राजासिंग यांनी म्हटले. तसेच सिंकदराबाद आणि करिमनगरचेही नाव बदलण्याची गरज असल्याचे राजासिंग म्हणाले.