... म्हणून शशी थरूर यांचा पराभव; जी-२३ गटात पडली होती फूट; प्रियांकांचा प्रचारही कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 08:47 AM2022-10-28T08:47:02+5:302022-10-28T08:49:32+5:30
Shashi Tharoor : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज भरताना खरगे यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीतील अनेक नेत्यांनी अनुमोदन दिले होते.
- आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव होण्यामागे प्रियांका गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचा केलेला प्रचार असल्याची चर्चा आहे. खरगे यांच्या तुलनेत थरूर यांना केवळ १० टक्के मते मिळाली होती.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज भरताना खरगे यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीतील अनेक नेत्यांनी अनुमोदन दिले होते. खरगे हे परिवाराचे उमेदवार असल्याचाच संदेश त्यातून गेला होता. या निवडणुकीत स्वतः सोनिया गांधी यांनी कोणतेही भाष्य केले नाही. दुसरीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत गुंतलेले होते.
मात्र, प्रियांका गांधी यांनी खरगे यांच्यासाठी छुपा प्रचार केला आणि त्यांनी जी- २३ गटातील वरिष्ठ नेत्यांना फोन करून काँग्रेस हायकमांडचा संदेशही पोहोचवला होता. थरूर यांना पक्षात येऊन दोन दशकेही झाली नसल्याची भावना जी- २३ गटातील नेत्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांकडून अध्यक्षपदासाठी थरूर यांना पाठिंबा कसा मिळणार?
जी- २३ मधील नेत्यांनी थरूर यांचे समर्थन का नाही केले?
- थरूर यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करण्याआधी कोणत्याही नेत्याशी चर्चा केली नव्हती. त्यापूर्वी गुलाम नबी आझाद आणि कपिल सिबल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. या गटातील नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांना हरयाणा काँग्रेसची धुरा देऊन हायकमांडने आपल्या बाजूने करून घेतले होते.
- मनीष तिवारी आणि आनंद शर्मा हे दोघेही विदेशी विषयांतील तज्ज्ञ मानले जातात. थरूरही याच विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे तिवारी आणि शर्मा यांच्याकडूनही त्यांना समर्थन मिळणेही दुरापास्त होते.