नवी दिल्ली - देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटकविधानसभानिवडणूकांच्या तारखांची घोषणा अखेर झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान (Voting) होणार आणि १३ मे रोजी निकाल (Result) लागणार आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तातडीने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यंदा निवडणुकांसाठी जाणीवपूर्वक बुधवारची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामागे, आम्ही लॉजिकली विचार केल्याचं आयुक्तांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं, हाच यामागचा हेतू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कर्नाटकच्या २२४ विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, अनुसूचित जातीसाठी ३६ जागांवर आरक्षण आहे, तर अनुसूचित जमातींसाठी १५ जागा राखीव आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी १० मे रोजी मतदान घेण्यात येणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. १० मे रोजी मतदानादिवशी बुधवार येत आहे. तर, मतदानासाठी मुद्दामहून बुधवार निश्चित करण्यात आला आहे. कारण, त्यामागे निवडणूक आयुक्तांनी सुट्टीचं गणितही मांडलं.
मतदानासाठी सोमवारची किंवा मंगळवारची तारीख निश्चित केल्यास मतदार हे शनिवार, रविवार आणि सोमवार असा सुट्टीचा प्लॅन करुन फिरायला जातात. किंवा, मगळवारी मतदान ठेवल्यास सोमवारची सुट्टी टाकून ४ दिवसांची ट्रीप आयोजित करतात. तसेच, गुरुवार आणि शुक्रवार बाबतहीही घडते, त्याला लागून शनिवार व रविवार सुट्टीचं नियोजन करण्यात येतं. मात्र, बुधवार ही मतदानाची तारीख निश्चित केल्यामुळे २ दिवसांची सुट्टी कोणी घेणार नाही, ज्यामुळे केवळ १ दिवसाची सुट्टी मिळेल आणि मतदार हे मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील, असा तर्क आणि विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बोलून दाखवला.
५८ हजार मतदान केंद्र
कर्नाटक मध्ये ५८,२८२ मतदान केंद्र असून २०,८६६ शहरी केंद्र आहेत. ज्यामध्ये ५०% मतदान केंद्रांवर म्हणजेच २९,१४० केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहेत. तर, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी २४० मतदान केंद्रांना मॉडेल पोलिंग स्टेशन बनवण्यात येत असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
२४ मे रोजी संपतोय विधानसभेचा कार्यकाळ
यापूर्वीच्या पंचवार्षिक म्हणजेच २०१८ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २७ मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच २९ मार्च रोजी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्नाटकात १० मे रोजी मतदान होत असून १३ मे २०२३ रोजी निकाल हाती येणार आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे.