Lawrence Bishnoi : चंदीगड : गेल्या अनेक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे. पण, तुरुंगात असून देखील लॉरेन्स बिश्नोई आपल्या गँगकडून अनेक धक्कादायक गोष्टी घडवून आणत आहे. लॉरेन्स बिश्नोई हा एक गँगस्टर आहे. त्याच्यावर अनेकांच्या हत्या केल्याचा आणि सेलिब्रिटींना धमकावल्याचा आरोप आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसवाला, करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामडी यांची हत्या असो किंवा अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण असो, या सर्व प्रकरणांमागे त्याचा हात असल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई जसजसा तुरुंग बदलत राहिला, तसतसा त्याच्या टेरर सिंडिकेटचा मोठ्या पद्धतीने विस्तार झाला आहे. गुंड आणि कुख्यात गुन्हेगार त्याच्या संपर्कात आले आणि त्याने सर्वांना सोबत घेतले. आज जगभरात पसरलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये 700 हून अधिक शूटर्स आणि 80 हून अधिक गुंड असल्याचे सांगितले जाते.
लॉरेन्स बिश्नोईचे नेटवर्क जगभर पसरलेले आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आदी देशांतही त्याचे साथीदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडामध्ये गोल्डी ब्रार, लेखप्रीत आणि सत्यवीर हे लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार आहेत. तर घरमन कहलॉन, गुरप्यार बागापुराना, वीरेंद्र, अमनदीप मुलतानी आणि अनमोल बिश्नोई हे अमेरिकेत लपले आहेत. याचबरोबर, लखा कुरुक्षेत्र पोर्तुगालमध्ये, मनीष भंडारी थायलंडमध्ये आणि राजा ऊर्फ माँटी इंग्लंडमध्ये आहेत. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्सचा धाकटा भाऊ आहे.
अनेक राज्यांत पसरले आहे नेटवर्क नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काही काळात लॉरेन्स बिश्नोईची गँग फक्त पंजाबपुरती मर्यादित होती. मात्र आता या गँगने देशभरात आपले अस्तित्व निर्माण केले आहे. ही गँग आता पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडमध्ये पसरली आहे. अलीकडेच मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या शूटर्सपैकी दोन उत्तर प्रदेशचे आहेत.
लॉरेन्सने इतर अनेक गँगनाही दिलीय साथ लॉरेन्स बिश्नोई यांच्यासोबत आज अनेक मोठ्या आणि धोकादायक गँग आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये दिल्लीचा हाशिम बाबा गँग, हरयाणाचा कला जाठेदी, गोगी गँग, सुखविंदर ग्रुपचा समावेश आहे. राजस्थानमधील आनंदपाल गँग, यूपीतील ब्रिजेश सिंह, धनंजय सिंह, बिहारमधील अनंत सिंग आणि राजन तिवारी हेही लॉरेन्स बिश्नोईच्या गँगसोबत आहेत. इतकंच नाही तर पाकिस्तानचा खलिस्तान समर्थक दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याचा लॉरेन्स बिश्नोईशी संबंधही समोर आला आहे.
लॉरेन्स बिश्नोईचे खास साथीदारलॉरेन्स बिश्नोईचे काही खास साथीदार देश-विदेशातून ही गँग चालवत आहेत. यामध्ये रोहित गोदरा, सतविंदर सिंह उर्फ गोल्डी ब्रार, काला जथेडी उर्फ संदीप झांझारिया, अनमोल उर्फ भानू, सचिन बिश्नोई उर्फ सचिन थापन आणि कपिल सांगवान यांसारख्या काही नावांचा समावेश आहे. एकट्या पंजाब-हरयाणामध्ये गोल्डी ब्रारवर जवळपास ५४ गुन्हे दाखल आहेत. अनमोल आणि सचिन मूसवाला हत्याकांडातील आरोपी आहेत.