मेजर नवनीत वत्स यांनी 20 वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये देशासाठी बलिदान दिले होते. आता त्यांची मुलगी लेफ्टनंट इनायत वत्सही भारतीय सैन्यदलात दाखल झाली आहे. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग एकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तिची मिलिट्री इंटेलिजेंस क्रॉप्समध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पासिंग आऊट परेडमध्ये वत्सने त्याच ऑलिव्ह हिरव्या रंगाचा युनिफॉर्म परिधान केला होता जो तिचे वडील घालायचे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी तिने वडिलांना गमावलं होतं.
Army Training Command, Indian Army ने आपल्या ट्विटर अकऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. सैन्याची मुलगी लेफ्टनंट इनायत वत्स तुमचं स्वागत आहे. या मेसेजसोबत वत्सचा फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोत इनायत वत्सची आई शिवानी वत्सही सोबत दिसत आहेत. मेजर नवनीत वत्स हे चंदीगडचे रहिवासी होते आणि तीन गोरखा रायफल्स रेजिमेंटच्या चौथ्या बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती.
2003 मध्ये शहीद झाले वडील
नोव्हेंबर 2003 मध्ये श्रीनगरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईत ते शहीद झाले होते. त्यांच्या शौर्य आणि सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना "सेना पदक" शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इनायत वत्स दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीधर आहे. एप्रिल 2023 मध्ये चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग एकॅडमीमध्ये सामील होण्यापूर्वी, ती दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये मास्टर डिग्री घेत होती.