हैदराबाद - दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम, पण मुलीकडून लग्नाला विरोध होता. अखेर घरच्यांचा विरोध डावलून दोघांनीही पळून जावून आपला संसार थाटला. पण, त्यांच्या या संसाराला त्यांच्याच जन्मदात्यांची नजर लागली. आपल्या मुलीने दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत लग्न केलं याचा राग धरून मुलीसमोरच तिच्या प्रियकराचा निर्घृण खून करण्यात आला. सैराट चित्रपटाची कथा सत्यात उतरावी असेच काहीसे तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे घडले. मात्र, आज प्रणय अन् अमृताचं प्रेम जिंकलंय. कारण, अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय.
आपल्या मुलीने आतंरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पतीची तिच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली होती. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील लिंगराजूपल्ली येथे 14 सप्टेंबर 2018 मध्ये ही घटना घडली होती. मात्र, प्रणयची पत्नी अमृताने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. विशेष म्हणजे लग्नच्या पहिल्या वाढदिवसादिवशीच अमृताने मुलाला जन्म दिलाय. आज अमृता प्रचंड खुश आहे, तिनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन आपला आनंद सर्वांशी शेअर केलाय. पण, अमृतासोबत तिचा पती, तिचा प्रेमी प्रणय नाही. प्रणयच्या आठवणींना सोबत घेऊन आपल्या मुलाच्या जन्माचा आनंद अमृता साजरी करतेय. अमृताच्या वडिलांनी जरी प्रणयचा खून घडवून आणला, तरी आज मुलाच्या रुपाने पुन्हा प्रणयच अमृताकडे परतल्याची भावना नेटीझन्स व्यक्त करत आहेत. अमृताच्या वडिलांनी या दोघांचं प्रेम नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाच्या रुपाने पुन्हा हे प्रेम परतलंय. दोघांच्या प्रेमाची निशाणी म्हणून अमृताचा मुलगा जगाला दिसतोय. त्यामुळे या दोघांचं प्रेम जिंकलंय. तिच्या वडिलांचा द्वेष अन् संताप पुन्हा एकदा पराभव झालाय.
प्रणयच्या वडिलांनीही आनंद व्यक्त करताना आम्ही खूप आनंदी असल्याचं म्हटलंय. बाळ आणि अमृता दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. पण, अमृताच्या कुटुंबीयांपासून आम्ही दोघांनाही दूर ठेवलं आहे. तरीही, आम्हाला भीती वाटते, त्यामुळे आमच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी प्रणयचे वडिल बालास्वामी यांनी केली आहे.
तेलंगणातील या 'ऑनर किलिंग' प्रकरणामुळे देश हादरला होता. आपल्या मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील टी. मारुती राव यांनी ख्रिश्चन दलित समाजातील पेरुमला प्रणय याची हत्या करण्यासाठी एक कोटींची सुपारी दिली होती. त्यानंतर, मारेकऱ्यानं भर रस्त्यात अमृतासमोरच प्रणयवर वार केल्याचा भीषण व्हिडीओ सोशल मीडियावरुन जगभर व्हायरल झाला. हैदराबादपासून 80 किलोमीटरवरील एका भव्य राजवाड्यात अमृता आणि प्रणय यांनी प्री-वेडिंग व्हिडीओ शूट केला होता. एखाद्या सिनेमातील गाणं असावं असंच हे शूटिंग झालं होतं. त्यात दोघंही खूप खूश दिसत होते. हा व्हिडीओ अमृताने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. त्यावर, लाईक्सचा पाऊस पडला खरा, पण आपली मुलगी खालच्या जातीच्या मुलासोबत इतकी आनंदात आहे, हे अमृताच्या वडिलांना बघवलं नाही. त्यांच्या रागाचा भडका उडाला आणि 'सैराट'ची पडद्यावरची कथा तेलंगणात प्रत्यक्षात घडली. प्रणयची हत्या करायची, त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा, तो व्हिडीओ व्हायरल होईल आणि हा प्रेमाचा व्हिडीओ झाकोळून जाईल, असा टोकाचा विचार करून त्यांनी जावयाच्या हत्येसाठी एक कोटींची सुपारी दिली. तेलंगणाच्या नलगोंडा जिल्हयातल्या मिर्यालगुडा इथं आज दिवसाढवळया एका प्रेम विवाहीत जोडपं जात असतांना पतीची पत्नीसमोर धारदार कोयत्याने हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणाने देशभर संतापाची लाट उसळली होती.