सुरेश भटेवरा, नवी दिल्लीकायद्यापेक्षा महाराणी श्रेष्ठ, या परंपरेचा भारताने कधीही स्वीकार केलेला नाही. संसदेचे कामकाज रोखण्यापेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी न्यायालयीन प्रक्रि येचा सामना केला पाहिजे, अशा तिखट शब्दात अर्थमंत्री जेटलींनी कोणाचेही नाव न घेता गांधी परिवारावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. लागलीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही तिखट शब्दांत पलटवार केला. शिवाय काँग्रेसने शुक्रवारीही संसदेच्या उभय सभागृहांमधे आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सरकार काँग्रेसशी दुर्भावनेने व राजकीय सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोपही स्पष्टपणे फेटाळून लावताना जेटली म्हणाले, सरकारने अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही. सोनिया व राहुल गांधींचे थेट नाव न घेता जेटली म्हणाले, राजकीय पक्षाच्या आर्थिक उत्पन्नाला आयकरातून सूट असते. अशी रक्कम काँग्रेसने एका रिअल इस्टेट कंपनीच्या नावे वर्ग केली. आर्थिक उलाढालीच्या या प्रकारात काँग्रेसने स्वत:साठी स्वत:च एक चक्रव्यूह तयार केला आहे. आयकर अधिकारी नियमानुसार आपले काम करीत आहेत. सक्त वसुली संचलनालयाने संबंधितांना अद्याप कोणतीही नोटीस बजावलेली नाही वा या प्रकरणी सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. तरीही सरकार राजकीय सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, तो गैर आहे.संपुआ सरकार सत्तेवर असल्यापासून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे नमूद करीत जेटली म्हणाले, दिल्लीतील एका फौजदारी न्यायालयाने सुनावणीसाठी हे प्रकरण दाखल करून घेतले. न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टाने नुकतेच योग्य ठरवले. कोणतेही निकाल नेहमीच अनिश्चित असतात. ही न्यायालयीन लढाई कायदेशीर मार्गानेच लढायला हवी. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. सरकार अथवा संसद काँग्रेसला सदर प्रकरणात कोणतीही मदत करू शकणार नाही.
हेरॉल्ड प्रकरणावरून जेटली-सोनिया वाक्युद्ध
By admin | Published: December 11, 2015 11:48 PM